पालघर- पी.डी. हिंदुजा रुग्णालयाच्या 'सर्व्ह विथ पॅशन' हा उपक्रम जव्हार तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागाकरिता जीवन संजिवनी ठरत आहे. “सर्व्ह विथ पॅशन” या ग्रामीण आरोग्यसेवेच्या माध्यमातून पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने “सर्वांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा” या आपल्या बांधिलकीशी निष्ठा राखली आहे. जव्हार तालुक्यातील वंचित व्यक्तींना अत्याधुनिक आरोग्यसेवा व कल्याणकारी सुविधा पुरवून त्यांनी हे साध्य केले आहे.
२०११ मध्ये हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एस.पी. हिंदुजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला होता. या रुग्णालयाकडून गेली ९ वर्षे अत्यंत गरीब समुदायांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा व कल्याणकारी सुविधा मोफत पुरविण्यात आला. त्यामुळे हा उपक्रम असंख्य आयुष्यांना स्पर्श करीत आहे. सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा कार्यक्रम गरजूंपर्यंत जाऊन त्यांना पोषणात्मक सहाय्य, प्राथमिक स्वच्छतेच्या सवयींबाबत शिक्षण आणि जगण्यासाठी मुलभूत बाबी (चपला, हिवाळी/पावसाळी कपडे, टॉवेल्स, साबण आदी) मोफत पुरवते.
या कार्यक्रमांतर्गत दर सोमवारी २ एएमएचयू व १० बीएमएचयूंचा (यामध्ये १ स्त्रीरोगविषयक व्हॅन, १ फिजिओथेरपी व्हॅन व १ नेत्रविकारविषयक व्हॅन यांचा समावेश होतो) ताफा अतिप्रगत निदानात्मक उपकरणांसह पालघर येथील सिम्फनी लेक रिव्ह्यू रिसॉर्टजवळील एका ठिकाणी जमतो. आणि तेथून या वाहनांचे मार्ग वेगळे होतात. ही वाहने जव्हार तालुक्यातील अनेक छोट्या खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन त्यांना वैद्यकीय सेवा पुरवतात. २०१८-१९ मध्ये सदरील कार्यक्रमांतर्गत फिरत्या आरोग्य केंद्रांनी ६५,१२८ रुग्णांना भेट दिल्याची नोंद आहे.
हेही वाचा- पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
यंदा जव्हारच्या दुर्गम भागातील ८ नवीन खेड्यांमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध करून देऊन या शिबिरांनी एक नवीन टप्पा सर केला आहे. शिबिरांद्वारे तयार करण्यात आलेल्या ओपीडी ३०० हून अधिक पाड्यांपर्यंत पोहोचल्या. फिरत्या नेत्रोपचार केंद्रामार्फत, या कार्यक्रमांतर्गत ४६३९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण ६९८ लाभार्थ्यांना दृष्टी सुधारण्यासाठी चष्मे पूर्णपणे मोफत देण्यात आले आहे.
स्त्रियांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी १०६ जणींच्या पॅप स्मीअर चाचण्या करण्यात आल्या, तसेच स्तनांची स्वयंतपासणी करण्याचे प्रशिक्षणही स्त्रीरोगविषयक व्हॅनद्वारे देण्यात आले. यामुळे कॅन्सरचे निदान लवकर होणे शक्य होणार आहे. गरोदर स्त्रिया तसेच नवजात बाळांची डॉक्टर्स दर आठवड्याला कुपोषणासंदर्भात तपासणी करतात.
ज्याला गरज भासेल त्याप्रमाणे उपचारही दिले जातात. यामुळे वजन वाढवण्यात, हिमोग्लोबिन (लोह) पातळी वाढवण्यात तसेच बाळाचे सरासरी वजन २.८ किलोवर नेण्यात यशस्वीरित्या मदत झाली आहे. त्याचबरोबर, एएनसी-पीएनसी कार्यक्रमांमधील सर्व नवजात बाळांसाठी कपडे, दुपटी, ब्लँकेट, गादी, मच्छरदाणी, टोपी, मोजे आदी वस्तूंचा समावेश असलेले बेबी किट्स दिली जातात.
जव्हार तालुक्यामधील विद्यार्थ्यांना स्वच्छ पेयजल पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे
४६ शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर्स पुरवण्यात आले आहेत. पोषण, व्यसनमुक्ती, आरोग्यकारक जीवनशैली यांवर ग्रामीण भागात कार्यशाळा घेतल्या जातात. सरकारी आदिवासी निवासी शाळांमधील ४०० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘नो युअर बॉडी’ कार्यक्रम आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांची रक्त तपासणीही करण्यात आली आहे.