पालघर - कोरोना पार्श्वभूमीवर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लादण्यात आले असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र व गुजरातला जोडणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी, झाई चेक पोस्टवर गुजरात व राजस्थानमधून येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मुंबई- अहमदाबाद महामार्गावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीकरिता पाच ठिकाणी दहा पथके तैनात केली आहेत.
परराज्यातील प्रवाशांची शारीरिक स्क्रीनिंग व तपासणी -
महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग तसेच तपासणी करण्यात येत असून ज्या प्रवाशांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आहे, अशा प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना तपासणी अहवाल नाही अशांची स्क्रीनिंग व तपासणी करूनच त्यांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. तपासणी दरम्यान एखादा संशयित आढळून असल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रस्ता मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम -
दिल्ली एनसीआर त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीची आणि शारीरिक तपासणीसाठी महामार्गावर पाच ठिकाणी दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या प्रवाशांना कोविड-१९ लक्षणे नसतील त्यांना दाखल होण्याची परवानगी असेल. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यांना परत त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्याची संधी दिली जाईल. अथवा त्यांना वेगळे करून अँटीजेन टेस्ट घेतल्या जातील. जर ते निगेटिव्ह आले, तर त्यांना पुढे प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. ज्या प्रवाशांनी कोविड-१९ चाचणी केलेली नसेल किंवा जे पॉझिटिव्ह असतील, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल.
आजपासून महाराष्ट्रात हवाई मार्गे, रेल्वेने आणि बसने दाखल होणाऱ्या बाहेरील राज्यातील प्रवाशीवर्गाचे RT-PCR नमुने घेतले जात आहेत. राज्यातील रेल्वे स्थानके, विमानतळे, चेक पोस्ट अशा ठिकाणी ही तपासणी होत आहे. राज्यात कोरोनाचा पादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील रेल्वे स्थानके, विमानतळे, चेक पोस्ट अशा ठिकाणी ही तपासणी होत आहे. मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी, झाई, वेवजी, नारायण ठाणे, उधवा, खुबाले हे चेक पोस्ट कोरोना तपासणी करण्यासाठीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये होणार रवानगी -
खाजगी प्रवाशी वाहतूक बसेस, खाजगी वाहने,आणि इतर वाहतूक यांची आरोग्य तपासणी ही नाक्यावर केली जात होती.या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलिस कर्मचारी दिसून येत होते. लक्षणे आढल्यास जवळील कोविड सेंटर. एखादा रुग्ण कोरोना लक्षणे आढलून आल्यास त्याला जवळील कोविड केअर सेंटर या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.