पालघर गर्भवती महिलेस आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला आपल्या जुळ्या बालकांचा डोळ्यादेखत मृत्यू पहावा लागला. वंदना बुधर असे या गर्भवती महिलेचे नाव आहे. वंदना या मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील रहिवाशी आहेत. या महिलेला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला.
हेही वाचा विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत टेम्पो दमणमध्ये सापडला
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, विज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोलीकरून पायपीट करत दवाखान्यात जावे लागते आहे. तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी मिळून सुद्धा आजही हा भाग विकासापासून कोसो दूर असून लोकप्रतिनिधींनी याचा बोध घेणे गरजेचे आहे.
मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथील वंदना बुधर (वय 27) या गर्भवती महिलेस शनिवारी 13 ऑगस्ट ला प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने ती घरीच प्रसुत झाली. तीने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, या जुळ्यांना तेथे आरोग्य सेवा ऊपलब्ध नसल्याने, तातडीने ऊपचार मिळाले नाही. त्यामुळे, या जुळ्यांचा तेथेच मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर वंदनाला आपल्या मुलांचा मृत्यू पहावा लागला.
दरम्यान, वंदनाला स्वातंत्र्य दिनी अधिकच त्रास जाणवू लागल्याने गावाला रस्ता नसल्याने येथील नागरिकांनी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. तेथून तिला वाहनाने दवाखान्यात दाखल केले. याच गावातील अन्य एका गर्भवती महिलेला डोली करून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या भागाला रस्ता नसल्याने महिनाभरात डोली करून रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याच्या पाच घटना घडल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसांपूर्वीच भेट दिली या भागात मागील महिन्यात अशाच घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत पदभार स्विकारताच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी चारच दिवसांत बोटोशी ग्रामपंचायतीला भेट दिली होती. तसेच, बोटोशी गावठाण आणि मरकटवाडी येथे रस्ता तयार करण्यासाठी पाहणी करून संबंधित खात्याला कारवाईचे आदेश दिले होते.
अतिदुर्गम बोटोशी गावठाण, तसेच मरकटवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने, तातडीने आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे, या भागात नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागते आहे. येथे तातडीने रुग्ण सेवा मिळावी म्हणून येथे आरोग्य पथक अथवा रेस्क्यू कॅम्प स्थापन करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे, बोटोशीचे माजी सरपंच तुकाराम पवार म्हणाले.
हेही वाचा Independence Day स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पालघर जिल्ह्यात 6 लाख 50 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप