पालघर : वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांड ( Shraddha Murder Case ) प्रकरणाने देशभर संताप व्यक्त होत असून, गेल्या आठवडाभरापासून दिल्ली पोलिस आणि माणिकपूर पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध स्तरावर शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी आफताब याने पुरावा नष्ट करण्यासाठी श्रद्धाचा मोबाइल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.
श्रद्धाच्या मोबाईलचा शोध सुरू - दिल्ली पोलिस गेला आठवडाभर वसईमध्ये या प्रकरणाचा छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. माणिकपूर पोलिसांच्या साह्याने ही शोधमोहीम सुरू आहे. भाईंदरच्या खाडीमध्ये रेल्वे लाइनच्या परिसरातून दोन बोटीत व दोन पानबुडे सहाय्याने खोल समुद्रात ही शोधमोहीम दुसऱ्या दिवशी सुरु ठेवण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये श्रद्धाचा मोबाइलही महत्त्वाचा ऐवज ठरणार आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून दिल्ली आणि माणिकपूर पोलिस श्रद्धाचे मित्र-मैत्रिणी, डॉक्टर, वडील, घरमालक, सोसायटीचे पदाधिकारी यांचे जाबजवाब नोंदवत आहेत.
आफताबने श्रद्धाचा मोबाईल खाडीत टाकला - श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब हा काही काळ तिचा मोबाइल वापरत होता. मात्र, त्यामुळे आपण अडचणीत येऊ, ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचा मोबाइल नष्ट करण्यासाठी भाईंदरच्या खाडीत टाकल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज दोन बोटीत व दोन पानबुडे सहाय्याने खोल समुद्रात ही शोधमोहीम सुरू आहे. तसेच पोलिसांच्या हाती काय पुरावे मिळाणार महत्त्वाचे आहे.
बिद्रे हत्येप्रकरणीही खाडीत घेतला शोध - दरम्यान, या आधीही पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी भाईंदरची खाडी ढवळून काढली होती. आता दिल्ली व माणिकपूर पोलिसांना काही पुरावा मिळतो का, यासाठी भाईंदरच्या खाडीत शोधमोहीम सुरू केली आहे.