पालघर - लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त महिला बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची कोरोना तपासणी केली असता, पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे त्या राहत असलेले पालघर शहरातील मिशन कंपाउंडच्या जवळपासचा परिसर सील करण्यात आला आहे.
या परिचारिकेसह त्यांच्यासोबत पालघर वरून मुंबईत बसने प्रवास करणाऱ्या १३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या क्वारंटाईन करण्यात आलेल्यांमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना तसेच बस चालक आणि वाहक यांचा समावेश आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून समजते. कोरोनाग्रस्त परिचारिकेच्या सहवासात आलेल्या इतर लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. त्यांचे देखील विलगीकरण करण्यात येणार आहे. पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाबधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णांची संख्या २१ इतकी झाली आहे.