पालघर Narayan Rane On Shankaracharya : केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी पालघर इथं शनिवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राम मंदिराबाबत वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांचा चांगलाच समाचार घेतला. शंकराचार्यांचं हिंदू धर्माच्या वाढीत योगदान काय, असा सवाल करत नारायण राणे यांनी वाद ओढवून घेतला. तर शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या विशेषणांचा वापर करत त्यांनी टीका केली. उबाठा गटाचे आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे बकवास माणसं आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
"उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस" : विरोधकांवर टीका करताना नारायण राणे यांनी त्यांना बेडकाची उपमा दिली. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना का बोलावले नाही, असा सवाल केला होता. याकडं लक्ष वेधता नारायण राणे म्हणाले, की "ठाकरे कोण लागून गेले ? ते माझे मार्गदर्शक आहेत का ? त्यांना कोण विचारते ? घरी तर बसला आहे, मातोश्रीवर बिन कामाचा. अशा बिनकामाच्या माणसाबाबत मला प्रश्न विचारू नका. त्या माणसाची एवढी धुलाई केली आहे, की तो घराबाहेर पडला नाही. आता त्यांची शिवसेना संपली आहे. उरलेल्या 16 पैकी आठ आमदार आमच्याकडं येतील." कल्याण डोंबिवली मतदार संघाबाबतच्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले, की " हा मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही, हे येत्या निवडणुकीत दिसेल. डुप्लिकेट कोण आणि खराब शिवसैनिक कोण हे कळेल."
राऊत शिवसैनिक कधी झाले : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत ते म्हणाले, की "संजय राऊत शिवसैनिक कधी झाला? मी तरी दोन रुपये भरून शिवसैनिक झालो. सामनाचा संपादक म्हणून तो आला. साठ वर्षांच्या योगदानाची भाषा करतो. शिवसेनेच्या स्थापनेला तरी साठ वर्षे झाली का? त्याची मानसिक स्थिती खालावली आहे. वाट्टेल तसे मनाला येईल तसे बोलतो." अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
मराठा आरक्षणाचा खरा लीडर मीच : "ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण नको, मराठ्याना पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिलं जावं. मराठा आरक्षण कुणाचे काढून नको ?" मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आणि आरक्षणाबाबत ते म्हणाले, की "मीच तर मराठा आरक्षणाचा अभ्यास करून शिफारस केली. त्यानुसार 16 टक्के आरक्षण मिळालं. जरांगे हे ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण मागतात. कुणाचं काढून मराठा समाजाला आरक्षण नको आहे. आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे."
मी लोकसभा लढवणार पण कुठून हे निश्चित नाही : नारायण राणे यांची राज्यसभेची टर्म येत्या एप्रिलमध्ये संपणार आहे. नारायण राणे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षानं दिल्याची चर्चा आहे. लोकसभा लढवण्यासाठी ते सज्ज आहेत का असं विचारलं असता, "मी लोकसभेची उमेदवारी लढवणार, पण कोणत्या मतदार संघातून लढणार हे निश्चित नाही" असं त्यांनी यावेळी सांगितलं.
जीडीपी वाढीसाठी उद्योग सुरू करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वारंवार कौतुक करताना त्यांनी "नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशाचा विकास झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोचली आहे, हे फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळंच शक्य झालं आहे," असा दावा त्यांनी केला. "भारताची अर्थव्यवस्था आणखी वाढण्यासाठी तसेच रोजगार वृद्धीसाठी लोकांनी उद्योग सुरू करा म्हणजे जीडीपी वाढेल," असा सल्ला त्यांनी दिला. "विकसित भारत संकल्प यात्रा मनोरंजनासाठी नसून जनजागृतीसाठी आहे" असं सांगून त्यांनी "महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य असावं" अशी अपेक्षा व्यक्त केली. "14 त्याचा मंत्री होतो. माझ्यात क्षमता असल्यामुळं मी दिल्लीपर्यंत गेलो. कमळ म्हणजे विकास आणि विकास म्हणजेच भवितव्य" असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :