विरार (पालघर)- कोरोनाच्या संकट काळात विरारमध्ये माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. विरार पूर्व गोपचरपाडा येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या अरविंद डांगे या चाळीस वर्षीय व्यक्तीचे आज दुपारी निधन झाले. घरात कोणी पुरुष नाही. शिवाय कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी कोणी नातेवाईकही येत नसल्याने डांगे कुटुंबीय एकाकी पडले होते.
तेव्हा त्यांची अडचण ओळखून त्याच परिसरात राहणाऱ्या नावेद खान या मुस्लीम तरुणाने शेजाऱ्यांना सोबत घेऊन डांगे कुटुंबियांना आधार दिला. त्याने अरविंद यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. याशिवाय त्याने घरापासून स्मशानभूमीपर्यंत अरविंद यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सद्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय परवानगीशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या सर्व कारणाने नागरिकांना आप्तेष्टांच्या अंत्ययात्रेलाही जाणे अवघड झाले आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अंत्ययात्रेसाठी मोजक्या लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा - 'यशोधन' इमारतीला रोनाचा विळखा; आयएएस, आयपीएस अधिकारी होम क्वारंटाईन
हेही वाचा - ..यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात लागणार ड्युटी..