पालघर : वसई विरार महानगरपालिकेतील (Vasai Virar Municipal Corporation) रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका एजन्सीमार्फत महानगरपालिका भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे समजते आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी तसेच स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी आग्रही मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Thakur) यांनी केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने या भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लिहिले आहे.
आमदार ठाकूर यांचे पत्र : कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबतच या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिकांना देखील प्राधान्य देण्याची अट नमूद करावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे. असे न झाल्यास आजपर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व स्थानिकांवर अन्याय होईल, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ३ जुलै २००९ रोजी अस्तित्वात आलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये वसई, विरार, नालासोपारा, नवघर माणिकपूर या ४ नगरपरिषदांसह ५५ महसुली गावांचा सामवेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवर तत्कालीन नगरपरिषदा व ग्रामपंचायती मधून वर्ग झालेले कर्मचारी कार्यरत आहेत. महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून महानगरपालिकेच्या मंजूर पदांची भरती प्रक्रीया झालेली नाही.
भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी : वसई विरार शहर महानगरपालिकेचे क्षेत्रफळ हे ३८० चौ. किमी असून, महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना विविध नित्योपयोगी व महत्वाच्या सोईसुविधा देण्यासाठी सद्याचा कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. ज्यामुळे वसई-विरार महानगरपालिकेतील रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने बाह्य मनुष्यबळ यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी घेण्यात आले आहेत. संवर्ग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (विद्युत) कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्क), विधी अधिकारी, आरेखक, सर्वेअर, अनुरेखक, लिपीक-टंकलेखक, आरोगय निरिक्षक, लघुटंकलेखक, प्रमुख माळी, सहा. उद्यान अधिक्षक, ग्रंथपाल, सहा ग्रंथपाल, वाहनचालक, फायरमन, चालक यंत्रचालक, तारतंत्री, दूरध्वनी चालक, अर्धकुशल मनुष्यबळ, मजूर, कक्षसेविका, कक्षसेवक, आया, शिपाई इत्यादी कर्मचारी हे विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत.
कत्रांटी कर्मचाऱ्यांना प्राध्यानाची मागणी : वसई-विरार महानगरपालिकेत अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास त्यांच्या कामाच्या अनुभवाचा फायदा प्रशासनाला व महानगरपालिकेला होईल, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. असे झाल्यास अत्यावश्यक व निकडीच्या आणि आपत्कालीन स्थितीत सेवा देताना अनुभवी कर्मचारी सोबत असल्याने त्या सेवा तातडीने व सुरळीतपणे देणे महापालिकेस शक्य होईल, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. महापालिकेत ठेका पध्दतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्याची अट नमूद न केल्यास अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेस महापालिका मुकेल, तसेच कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण निर्माण होईल असे आमदार ठाकूर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे सदर भरती प्रक्रियेत स्थानिकांना आणि कंत्राटी कर्मचारी यांना प्राधान्य देण्यासाठी संबंधित विभागाला सूचित करावे अशी आग्रही मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे.