पालघर - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सफाळे- टेम्भीखोडावे रस्त्यावरील मांडे येथील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक पिता-पुत्र मोटार सायकलवरून धोकादायकरित्या प्रवास करत होते. त्यांनी हा नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे पितापुत्र नाल्याच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. याचवेळी तेथून कामावरून रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या स्थानिक स्वप्नील राऊत, कौशल पाटील, प्रदीप भोईर यांनी त्यांना पाहिले.
या तिघांनी तत्काळ स्थानिकांना बोलावले; आणि स्थानिकांनी पितापुत्राला एका दोरखंडाच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढले.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुख्य शहरासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकणी पाणी साचले आहे. काही सोसायट्यांमध्ये देखील पाणी साचल्याने घरगुती वस्तू खराब झाल्या आहेत.