पालघर - अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात वसई पंचायत समिती, सभागृहात उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी घेण्यात आली. मात्र, उपस्थित नागरिकांच्या विरोधामुळे ही जनसुनावणी गुंडाळण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघरमध्ये काल (बुधवारी), डहाणूमध्ये आज (गुरुवारी), तर तलासरी तालुक्यात 22 तारखेला बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी घेण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघर जिल्ह्यात सर्वत्र होणारा विरोध पाहता, इतर ठिकाणीही प्रशासनाला वसईत झालेल्या जनसुनावणी प्रमाणेच त्यांच्या विरोधामुळे गुंडाळावी लागेल असेच काहीसे चित्र आहे.
हेही वाचा- IFFI 50 : राजकारण आणि धर्मांधतेमुळ निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर - गोरान पास्कल्जेविक
वसई पंचायत समिती, सभागृहात उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण 398 हेक्टर जमीन बाधित होणार आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील 288 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. त्यात मोठ्या प्रमाणात विविध गावातील जमिनी व नागरिक यामुळे बाधित होणार आहेत.
बुलेट ट्रेन संदर्भातील जनसुनावणीला मोठ्या संख्येने बाधित शेतकरी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बुलेट ट्रेन आमच्या हिताची नसून आमची लोकल ट्रेन, उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे गरजेचे आहे. आम्ही बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणार नाही. ही जनसुनावणी रद्द करा, अशी भूमिका पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारचे समन्वयक समीर वर्तक यांनी यावेळी घेतली. भूमिपुत्र बचाव आंदोलनचे शशी सोनावणे यांनी बुलेट ट्रेनच्या विरोधातील तांत्रिक बाजू आणि काही आक्षेप उपस्थित केले.आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे यांनी आमच्या आदिवासी समाजाला त्रास देऊ नका ही भूमिका मांडत विरोध केला. मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनीही मनसेच्या स्टाईलने विरोध केला. या जनसुनावणीला बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी देखील उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनीही आपल्या जमीन देण्यास यावेळी नकार देत या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.
उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी सर्वांचा बुलेट ट्रेनला विरोध आहे, असे नमूद करून जनसुनावणी संपविली. त्यानंतर भूमिपुत्र बचाव आंदोलन, पर्यावरण संवर्धन समिती आणि आदिवासी एकता परिषदेतर्फे बुलेट ट्रेन रद्द करा या मागणीची पत्रेही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आली. उपस्थित पर्यावरणवादी तसेच इतर सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला असून, याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.
या जनसुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे तसेच पर्यावरण संवर्धन समितीतर्फे फारूक मुल्ला, विक्रांत चौधरी, अभिजित घाग, दर्शन राऊत, आदिवासी एकता परिषदेची वसई तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक, स्वाभिमानी वसईकरचे रॉजर परेरा आणि विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.