पालघर - सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हरित इमारत संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेंतर्गत पालघर जिल्ह्यात प्रशासकीय इमारती बांधण्यात आल्याने उपविभागीय अभियंता महेंद्र किणी यांना कोकण विभागातून पुरस्कार मिळाला आहे. नागपूर येथे ग्रीहा कौन्सिल मार्फत आयोजित पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते किणी यांचा गौरव करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील व सचिव अजित सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र किणी यांनी पालघर जिल्ह्यात हरित इमारत संकल्पनेवर आधारित विविध प्रकल्प जिल्ह्यात राबवले आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रचलित पद्धतीने इमारतीचे आराखडे व नकाशे तयार न करता हे नकाशे व आराखडे हरित इमारत संकल्पनेचा आधार असलेले असावे, असे धोरण शासनाने 2016 मध्ये राबवण्याचे ठरवले. त्यानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय अंतर्गत प्रशासकीय इमारती बांधत असताना या संकल्पनेचा आधार घ्यावा, असे सुचित केले होते. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातही या संकल्पनेवर आधारित असलेले विविध प्रकल्प किणी यांनी आपल्या कारकीर्दीत केल्याने त्यांना ग्रीहा कौन्सिल तर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
पालघर जिल्ह्यात महत्त्वाचे असे मनोर हे 200 खाटांचे हॉस्पिटल, पालघर व मनोर ग्रामीण रुग्णालय, वारली हाट तसेच प्रशासकीय कार्यालय इमारती या हरित संकल्पनेवर आधारित आहेत. त्या अनुषंगाने किणी यांनी या कार्यालयांमध्ये उपाययोजना केलेल्या आहेत. हे लक्षात घेऊन ग्रीहा कौन्सिल मार्फत झालेल्या परीक्षणामध्ये किणी यांची निवड करण्यात आली.