पालघर - पश्चिमेस असलेल्या केळवे - कपासे या मार्गावर सध्या खड्यांचे साम्राज्य असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्ड्यांमुळे येथील स्थानिकांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 2 दिवसात या रस्त्यावरचे खड्डे बुजवा अथवा अभियंता कार्यालयात खड्डे पाडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
केळवे-कपासे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य नागरिकांचे हाल -
पालघर पश्चिमेस माकूणसार खाडीवरील पूल धोकादायक झाल्यामुळे मार्च महिन्यात या पुलाचे काम हाती घेण्यात आले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. सफाळे व आसपासच्या परिसरात जाण्यासाठी केळवे- कपासे या पर्यायी मार्गाचा वापर करून जावे लागते. मात्र, केळवे-कपासे या मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून रस्त्याच्या दुरीस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, मागील अनेक काळापासून या ठिकाणी फक्त खडी टाकून ठेवण्यात आल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अपघात होऊन अनेकांना दुखापत देखील झाल्या आहेत. या मार्गाने प्रवास करताना नागरिक, वाहन चालक व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
खड्डे बुजवण्यासाठी मनसेचा दोन दिवसाचा अल्टिमेटम -
केळवे- कपासे रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित विभागाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांच्या आत या रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत, तर जिल्हा परिषद अभियंत्यांच्या कार्यालयात घुसून खड्डे पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे.