पालघर - टेंभी येथील मच्छीमार रामदास गजानन तांडेल आणि उमेश जनार्दन तांडेल हे समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना जाळ्यात अडकलेले एक कासव त्यांना आढळले. ते कासव त्यांनी जाळ्यातून सोडून किनार्यावर ठेवले. मात्र, कासव जखमी असल्याचे लक्षात येताच त्यांनी कांदळवन कक्ष पालघर व संवर्धन मोहीम यांना संपर्क साधला.
कांदळवन कक्षाचे उपजीविका तज्ञ अनिकेत शिर्के व त्यांचे सहकारी किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी जखमी कासवाला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी डहाणू येथील कासव उपचार व पुनर्वसन केंद्रांमध्ये पाठवले. हे कासव ऑलिव्ह रिडले प्रजातीचे असून ते बऱ्याच दिवसांपासून जाळ्यामध्ये अडकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. भरतीच्या पाण्यामुळे ते समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले होते. स्थानिक मच्छीमारांच्या म्हणण्याप्रमाणे जुनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये अशाच प्रकारचे जखमी व जाळ्यात गुंतलेले कासव केळवा, माहीम, टेंभी, शिरगाव किनाऱ्यावर सापडतात.
अपारंपारिक पद्धतीने अर्थात पर्ससीन नेटद्वारे जी मासेमारी केली जाते या जाळ्यांमध्ये अशा पद्धतीने कासव गुंतले गेले तर कासवाचा पंख कापला जातो. अथवा जाळी कापून कासवाला समुद्रात सोडून दिले जाते. अशा प्रकारच्या जाळ्यांवर निर्बंध आणायला हवेत, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.