पालघर - जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा ( Bogus doctor ) रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डाॅक्टरांनी क्निनिक थाटले असून, रुग्णांकडून लाखो रुपयांची कमाई ( rupees from patients) केली जात आहे. बोगस डॉक्टरांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ ( Bogus Doctor playing patients ) सुरू असतांनाच आरोग्य प्रशासनाने मात्र, झोपेचे सोंग घेतले आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील गंजाड येथे एका बोगस डॉक्टरचा ( Bogus doctor exposed) ‘ईटीव्ही भारत’ने पर्दाफाश केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणताही अधिकार नसताना त्यांनी संबंधिताला क्लिनिक चालविण्यास परवानगी दिल्याचे उघड झाले आहे.
रुग्णांच्या जीविताशी खेळ - रमेश बारक्या गायकर असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना गायकर याने क्लिनिक उघडण्यासाठी 8 डिसेंबर 2014 रोजी गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना परवानगी मागितली होती. त्यावेळी या संदर्भात अधिकार नसतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्लिनिकसाठी परवानगी दिली होती. तेव्हापासून गायकर या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करत होते. आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने या माध्यमातून त्याने लाखो रुपयांची कमाई केली आहे. तर, दुसरीकडे आठ वर्षांच्या कालावधीत त्याने हजारो रुग्णांच्या जीविताशी खेळ केला आहे.
प्रशासनाला आली जाग - ‘ईटीव्ही भारत’ने गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान रमेश गायकर याने संबंधित क्लिनिक आरोग्य विभागातील सेवानिवृत्त डॉक्टर सिद्दीक कोम यांचे असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र, डॉ. कोम यांचा या क्लिनिकशी संबंध नसल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी गायकर याने डॉ. कोम यांची वैद्यकीय सेवेसंबंधी कागदपत्रे मागितली होती. त्यांनी फारशा विचारणा न करता गायकर याला कागदपत्रे दिली होती अशी, माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पत्र दिले आहे. तसेच गायकर विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिस निरीक्षकांना पत्र - याच प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाढेकर यांनी देखील गायकरविरुद्ध पोलिस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, ‘ईटीव्ही भारत’ने पर्दाफश केल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईसाठी हालचाली सुरू असताना रमेश गायकर याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित क्लिनिक आपले नसून डॉ. कोम यांचे असल्याचे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित क्लिनिक यापुढे केवळ डॉ. कोम चालवतील, तर मी त्यांना मदत करेल. त्यांच्या अनुपस्थितीत क्लिनिक बंद राहील, असे पत्रात नमूद करत गायकर याने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी घेतला ‘क्लास’ - जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवा सांबरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी यावेळी केल्याची माहिती मिळाली आहे.
कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना क्लिनिक चालवल्याप्रकरणी रमेश गायकर याच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिली आहे.
जिल्ह्याभरात बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा - केवळ डहाणू तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात अनेकांनी कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना क्लिनिक थाटले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काहींचा हा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. या माध्यमातून रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. आरोग्य विभागाचे मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. अशा बोगस डॉक्टरांशी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचीही चर्चा आहे. पोलिस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात गायकर यांचा उल्लेख डॉक्टर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - दहशतवाद्यांचे लाड पाकिस्तानला भोवले.. FATF ने दिला मोठा झटका.. 'ग्रे' लिस्टमध्येच राहणार