पालघर - लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाने परराज्यातील कामगारांना व मजुरांना गावी परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र, असे असले तरी या कामगारांची आपल्या गावी जाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. याचा फायदा घेत या कामगारांकडून दुप्पट भाडे उकळून त्यांची मालवाहू टेम्पोमधून अवैध वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे.
पालघर आणि बोईसर येथून उत्तरप्रदेश व इतर राज्यांत कामगारांना विनापरवाना घेऊन जाणारे मालवाहू टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. टेम्पोमध्ये 30 ते 40 कामगारांना एकत्र बसवण्यात आले होते. दलालांनी या कामगारांकडून आपल्या गावी परतण्यासाठी प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपये उकळले आहेत. टेम्पो मालक आणि चालकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.