पालघर - येथील कोळगाव गावात एका बंद गोडाऊन मध्ये अवैधरीत्या साठवणूक केलेले हजारो टन रासायनिक घनकचरा व घातक केमिकल आढळून आले आहे. यानंतर येथील जेनेसीस औद्योगिक परिसरात फेज 3 मधील पाच गोडाऊनमध्ये सुमारे 350 ड्रम आणि हजारो गोणी भरलेले हे घातक केमिकल गावकऱ्यांनी पोलीस आणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात दिले आहे.
कोळगाव हा ग्रीन झोन म्हणून ओळखला जातो. असे असताना येथे छुप्या पद्धतीने अवैधरित्या रासायनिक घनकचरा व टाकाऊ केमिकलची साठवणूक केली जात होती. यामुळे गावात परिसरात उग्र वास येत होता. तसेच पिण्याच्या पाण्याचे साठे दूषित आणि केमिकलयुक्त झाले होते. त्यामुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढत आहे. काल (रविवारी) रात्री एक ट्रक हे केमिकल घेऊन गोडाऊनमध्ये येत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.
मात्र, त्यानंतर ट्रक चालक आणि कामगार हा ट्रक सोडून फरार झाले. यानंतर या गोडाऊनमध्ये घातक रासायनिक केमिकल व रासायनिक धनकचरा साठवून ठेवला असल्याचे उघड झाले. तर पालघर पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि हा घातक रासायनिक केमिकल आणि घनकचरा आपल्या ताब्यात घेतला. तर पुढील कार्यवाही सुरु आहे.