पालघर - जव्हार येथे लग्नाच्या एक दिवसानंतर नवरदेव कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नवरदेवाच्या संपर्कात आलेल्या नवरीसह साठहून अधिक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवरदेव एका कोरोना पॉझिटिव्ह बस चालकाच्या संपर्कात आला होता. कोरोनाबाधित नवरदेवावर रुग्णालयात उपचार सुरू असून, आता नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांची देखील धाकधूक वाढली आहे
जव्हार येथील एक बस चालक नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात उपाचारासाठी गेला होता. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात पाठविले. या बस चालकाचे घशातील नमुने दोन वेळा कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, अहवाल दोन्ही वेळा निगेटिव्ह आले. दरम्यान, बस चालक जाऊन आलेल्या खासगी रुग्णालयातील व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या या नवरदेवाने आपले लग्नकार्य उरकून घेतले. त्याचदरम्यान पुन्हा बस चालकासह त्याच्या संपर्कात आलेल्याचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात त्या बस चालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला शिवाय नवरदेवाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला.
नवरदेवाच्या संपर्कात आलेल्या साठहून अधिक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.