पालघर - लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझीच आहे, असे म्हणत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी बळीराम जाधव यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. तसेच हरलो म्हणून ईव्हीएम मशीनला दोष देणार नाही, असेही ते म्हणाले.
लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कधी बहुजन विकास आघाडी पुढे तर कधी शिवसेना पुढे असा अतीतटीचा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्स्कवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (से), आर.पी.आय. (कवाडे गट), दलित पँथर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान सभा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी बविआला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनी मित्रपक्षांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभार मानले.
आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे आपले उमेदवार बळीराम जाधव यांना ४ लाख ८९ हजार ५३६ इतकी मते मिळाली. सर्व मतदारांचे आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांनी आम्हाला २ लाख २३ वरुन ५ लाखावर नेवून ठेवले. आम्ही हरलो समोरच्या उमेदवाराला गेल्या वेळी सव्वापाच लाख मते होती. मात्र. या निवडणुकीत त्यांच्या मतात फक्त २५ ते ५० हजार मतांची वाढ झाली. या पराभवाला मी एकटा जबाबदार आहे, मी कुठेतरी कमी पडलो, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आणि ५ वर्षात त्यांच्या हातून देशाचे येत्या कल्याण होवो, असे म्हटले.
पराभवाची मीमांसा करताना नागरिकांनी स्थानिक प्रश्न लक्षात घेतले नाहीत. लोकांनी फक्त कोण? हा विचार केला. स्थानिकांसोबत कोण राहतो, कोण कामे करतो, बळीराम जाधवांनी काय कामे केली याचा विचार जनतेने केला नाही. जाधवांनी काम केले. पण दुर्दैवाने ते पडले. त्यामुळे हा पराभव माझा आहे, अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली.