पालघर - जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून रात्रीपासूनच सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागामार्फत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार पालघर, बोईसर, डहाणूसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू तसेच किनारपट्टीसह, ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून भात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. येत्या चोवीस तासांत मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.