पालघर- मुंबईसह, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा ईशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार पालघरमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर, बोईसर, सफाळे, केळवे या भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
काही ठिकाणी पावसाची जोरदार तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दडीमारुन बसलेल्या पावसामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. मात्र, पहाटेपासूनच पालघर परिसरात पाऊस सुरू झाल्याने सर्वत्र ढगाळ वातावरणात आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालघरकर सध्या लाॅकडाऊन असल्याने घरातच बसून आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात मुंबईसह ठाणे, पालघर व तळ कोकणात मुसळधार पडण्याची शक्यता आहे.