पालघर - वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध पाहता महाविकास आघाडी सरकारने स्थानिकांसोबत राहावे, यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची देखील या शिष्टमंडळाने भेट घेत, वाढवण बंदर बाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी वाढवण बंदरास विरोधासंदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या या भेटीत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती तसेच जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शरद पवारांची भेट-
प्रस्तावित वाढवण बंदराबाबत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण गावात जाऊन बंदर कायमचे हद्दपार केल्याची घोषणा केली होती. वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध पाहता, त्यांनी आताही तेव्हाच्या आपल्या भूमिकेशी ठाम रहावे, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीला दिले आहे.
सुप्रिया सुळे यांची भेट-
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळाने खासदार सुप्रिया सुळे यांची देखील वाढवण बंदराला बाबत भेट घेतली. वाढवण बंदराचा प्रश्न केंद्र सरकार समोर ठेऊन केंद्रीय बंदर विकास मंत्री मंनसुख मांडविय यांच्याशी विचार विनिमय करून वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याशीही विचारविनिमय करून वाढवण बंदर रद्द करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
वाढवण बंदर प्रकल्प काय आहे वाद-
केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयाने डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रस्तावित आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर तसेच जगातील सर्वोत्कृष्ट १० बंदरांपैकी एक, अशी या बंदाराची रचना आहे. सदर बंदर बनवण्यासाठी २२ मीटर खोल समुद्रामध्ये ५ हजार एकराचा भराव करावा लागणार आहे.
बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध-
वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावे विस्थापित होणार असून स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उध्वस्त होऊन जाणार आहे. तसेच ५ हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणारअसल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावंच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत.
या महाकाय बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवाराची झाडे, समुद्रातील बीजोत्पादन खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटीच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येणार असून परिसरातील जैवविविधता मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. या वाढवण बंदर उभारणीला स्थानिक ग्रामस्थांचा आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे.