पालघर - आधुनिक काळात विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी केंद्रशासन व नीती आयोगाने सुरू केलेल्या कौशल्य विकास या उपक्रमांतर्गत वसई तालुक्यातील खानिवडे येथे पहिली 'अटल टिकरिंग लॅब' सुरू करण्यात आली आहे. नुकताच या लॅबचे उद्घाटन बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडले.
साततच्या पाठपुराव्याला यश -
वसई पूर्वेतील महामार्गालगत खानिवडे हा परिसर आहे. या भागात विविध ठिकाणच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञान याची ओळख व्हावी, याकरिता अशी लॅब असणे आवश्यक होते. यासाठी ग्रामविकास संस्थेकडून तसेच शिक्षकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर अटल टिकरिंग लॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळणार वाव -
संस्थेचे संस्थापक दिवंगत मधुकर घरत यांच्या १५ व्या स्मृतीदिनी ही लॅब सुरू करण्यात आली असून विविध प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लॅबमध्ये रोबोट, ड्रोन, असे आधुनिक तंत्रज्ञान जे ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना मिळत नव्हते, ते आता प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता विकसित होण्याचा मार्ग खुला होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. 'अटल टिंकरिंग लॅब'च्या निमित्ताने उच्च शिक्षणात मिळणारे शिक्षण, शालेय जीवनात मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार असल्याचे मत मुख्याध्यापक महेश कुडू यांनी व्यक्त केले.
हेहा वाचा - बुलडाण्याच्या बालसुधारगृहात दोन मुलांची गळफास घेवून आत्महत्या