वसई - वसई पूर्वेतील वालीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे, तर अनेक वाहने जळू खाक झाली आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वालीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त केलेल्या वाहनांना अचानक दुपारी १ च्या सुमारास आग लागली. या आगीत 3 चारचाकी वाहने आणि 32 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन, आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घटनास्थळी काही पोलिसांच्या गाड्या देखील उभ्या होत्या, मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने या गाड्या वाचल्या आहेत.
आगीचे कारण अस्पष्ट
अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे, मात्र वसई पोलीस ठाण्यातील जप्त केलेली वाहने पोलिसांनी भंगारात विकल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे ही आग लागली की, लावण्यात आली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.