पालघर - ठाणे जिल्ह्यामधील आदिवासी-डोंगराळ भागामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या शिवक्रांती सामाजिक संस्थेतर्फे ( Shivkranti Social Society ) दरवर्षी 'एक करंजी प्रेमाची ' हा उपक्रम (Ek Karanji Premachi activity completed ) राबविण्यात येतो. समाजातील विविध घटकांकडून करंजी , मिठाई , कपडे , साड्या , लाडू व फराळाचे साहित्य भेट म्हणून मिळवून त्यांचे वाटप गोर - गरिबांना करण्यात येते. गेली ते ३३ वर्ष हा उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतो. यावर्षीही वाडा तालुक्यातील तरेपाडा व वळवीपाडा या गावापासुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांच्या हस्ते करंजी व फराळाचे वाटप करण्यात आले.
रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये शेकडो आदिवासी महिलांनी शरद पाटील यांना ओवाळून भाऊबीजेची भेट म्हणून साडी स्वीकारली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शुभम पाटील , हरेश भुणभुणे , राम पाटील , लक्ष्मीबाई यशवंत पाटील , विराज पाटील , सुशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाऊबीजला आदिवासी महिलांना भेटायला त्यांचा सख्खा भाऊ येत नाही. या समाजामध्ये भाऊबीज हा सण साजरा होत नाही. हे लक्षात घेऊन शरद पाटील यांनी १९८९ साली कुंबिस्ते गावात जाऊन एकाच वेळी शेकडो मुली व महिलांना भाऊबीज करायला सुरुवात केली त्यावेळी ते ब्लाऊज पीस व मिठाई त्यांना देत असत. त्याचबरोबर ग्रामस्थांना जुने कपड्यांचे वाटपही करत असत.
हा उपक्रम गेली ३३ वर्ष सतत सुरू असून त्यामध्ये एकदाही खंड पडलेला नाही. यावर्षी तर गावातील सर्व महिलांना चांगल्या प्रतीच्या साड्यांचे वाटप करून आदिवासी महिलांचा आनंद द्विगुणीत केला आहे. भाऊबीजेच्या दिवशी तरेपाडा व वळवीपाडा गावामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली. शिवक्रांती च्या सर्व सदस्यांचे फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले. तर ग्रामस्थांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाऊबिजेच्या कार्यक्रमामध्ये ७ वर्षाच्या बालिकेपासुन ते ९० वर्षाच्या वृद्ध महिलेपर्यंत सर्वांना भाऊबीज भेट देण्यात आली. यावेळी परिसरातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भावपूर्ण सोहळ्याच्या गावातील सर्व लहानथोर मंडळी उपस्थित होते. यावेळी शरद पाटील यांनी ' मी जिवंत असे पर्यंत प्रत्येक भाऊबिजेला तुम्हाला भावाच्या नात्याने भेटायला येत राहीन ', असे सांगितले. शिवक्रांतीच्या या आगळ्या वेगळ्या भाऊबीज सोहळ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.