पालघर - विरार येथे भिंतीच्या फटीमध्ये अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची 12 तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली आहे. चाळपेठ येथील रहिवासी अनुरोध यांच्या घराशेजारी गुरूवारी भिंतीच्या फटीमध्ये 3 महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू अडकले होते. अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे मितेश जैन यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले होते.
हेही वाचा - उघड्या गटारात पडून ४ वर्षीय बालकाचा मृत्यू ; विरारच्या अर्नाळा बंदरपाडा येथील घटना
अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला या पिल्लाला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, त्याचे तोंड फटीत अडकल्याने भिंत तोडून त्याला बाहेर काढावे लागले. तब्बल १२ तासांच्या मेहनतीनंतर या पिल्लाला बाहेर काढण्यात यश आले. अन्न-पाण्याविना अशक्त झालेल्या या पिल्लावर 'करुणा' या सामाजिक संस्थेमार्फत उपचार करण्यात आले. कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल वसई-विरार अग्निशमन दलाच्या जवानांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.