पालघर - बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला नाही. तसेच या व्यापाऱ्यांना भाजपचाही पाठिंबा आहे. त्यामुळे बंद दुकाने पुन्हा उघडण्यावरून वाद उफाळून आला. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू झाली आहे.
बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीविरोधात आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पालघर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात ठेवण्यात आली आहे. मात्र, व्यापारी संघटनेने यामध्ये सामील होण्यास नकार दिला. तसेच व्यापाऱ्यांना भाजपने पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी बाजारपेठेतील बंद केलेली दुकाने पुन्हा उघडण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाद उफाळला. तसेच बहुजन क्रांती मोर्चा आणि भाजपप्रणित संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.