पालघर - भातपिक उत्पादक शेतकऱ्याचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नुकसानीची भरपाई उत्पादन खर्चापेक्षा जास्त मिळावी अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहेत. पालघर जिल्ह्य़ात खरीप हंगामातील भात पिकासाठी शेतकरीवर्गाचा मान्सूनपुर्व मशागतीपासून ते भात लागवड आणि भात झोडणीपर्यंत शेतीयोग्य विवीध कामांसाठी उत्पादन खर्च अधिक येत असतो. नुकसानीचे पंचनामे होत आहेत नुकसान भात पिकांचे झालेच आहे. मात्र, भातपिकाचा पेंढा भिजल्याने त्याला बुरशी पकडली आहे. ती कडवट बनल्याने ती जनावरांना खाण्या लायक नाही अन् ना विकण्याच्या लायक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनावरांना पेंढ्यांचा तुटवडा भासणार आहे.
इथल्या शेतकरीवर्गाचे भातपिक उत्पादनाला खर्च एकरी 25 ते 30 हजारांहून अधिक होत असतो असे शेतकरीवर्ग सांगतात. उत्पादन खर्च अधिक होत असताना नुकसानीची रक्कम किती? मिळेल आणि सेवा सहकारी संस्था (सोसायटी ) कर्ज कशी भरावीत या चिंतेत शेतकरी आहेत. पालघर जिल्ह्य़ातील नाणे गावातील चंद्रकांत गणपत पाटील, सुधाकर जगन्नाथ पाटील, राजेंद्र जयराम पाटील, सुगम उदय पाटील, विठ्ठल बाबूराव पाटील, सुनिल गणपत पाटील आदी शेतकऱ्यांसह इतर शेतकरीवर्गाने आपली नुकसान भरपाईबाबत शेतकरीवर्गाच्या व्यथा मांडली आहे.
पालघर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्र्यांसह आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पहाणी दौरे लागले. यानंतर लागलीच कृषी खात्यासह संबधीत अधिकारीवर्गाला पंचनामे करण्याचे आदेश मंत्र्यानी दिले. जिल्ह्यातील वाडा तालुक्यात 7 नोव्हेंबर पर्यंत पंचनाम्यात बाधीत शेतकरी संख्या 16 हजार 300 असुन बाधीत क्षेञ 7 हजार 800 हेक्टरी आहे.या बाधीत शेतकऱ्यांमध्ये पीकविमा उतरविलेले आणि अर्ज प्राप्त झालेल्या शेतकरीवर्गाची संख्या 3 हजार 815 इतकी आहे.यात पंचनामे झालेले 3450 शेतकरी असुन पंचनामा झालेले क्षेञ 2380 हेक्टर आहे. या तालुक्याच्या पंचनाम्याचे आकडेवारीत पीकविमा उतरविलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 43 हजार रूपये तर भाजीपाल्याला हेक्टरी 9 हजार आणि फळपिकाला हेक्टरी 13 हजार रूपये नुकसानभरपाई असल्याची माहीती वाडा तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी बोलताना सांगितले. तसेच तालुक्यातील या नुकसान भरपाईसाठी 14 कोटी 59 लाख रूपयांची मागणी करण्यात आल्याची माहीती माधव हासे यांनी सांगितले. जसजसे पंचनामे होत आहे तसा आकडा नुकसानीचा आकडा वाढणार आहे असे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.