पालघर - डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात वाणगाव-खड़खड़ा येथील सुभान रमजान खान (वय 60) या रुग्णाचा अत्यावस्थ स्थितीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला असून त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली आहे.
सुभान खान यांना सोमवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना वाणगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रात्रपाळीवर असलेल्या डॉ.हर्षला गाला यांनी खान यांच्यावर औषधोपचार केले. त्यानंतर सकाळी नऊ वाजता डॉ.ओशान डिसोझा हे ड्युटी वर आल्यानंतर त्यांना खान यांची प्रकृती खालावत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी रुग्णाला इतरत्र हलविण्यासाठी सांगितले. 108 क्रमांकाची रुग्णवाहिकाही मागविण्यात आली. मात्र, त्याचवेळी ऑक्सिजन लावत असताना सुभान खान यांचा मृत्यू झाला.
याची कल्पना डॉ.डिसोझा यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली, मात्र रुग्ण दगावल्याचा राग येऊन खान यांच्या नातेवाईकांनी डॉ. डिसोझा यांना मारहाण केली. याबाबत त्यांनी डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या तक्रारीवरून सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात 353, 335, 323, 34 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था अधिनियम 2010च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार होणार नसल्यास त्यांनी तत्काळ रुग्ण हलवण्याचा सल्ला दिला असता, तर आम्ही अन्य ठिकाणी उपचार घेतले असते. मात्र तासाभरानंतर रुग्णाला उपचार देण्यात आले, तत्काळ उपचार मिळाले असता तर जीव वाचला असता.
- असिफ खान मृत सुभान खान यांचा मुलगा