पालघर - विरार पश्चिमेकडील विद्या विहार इंग्लिश हायस्कुलमध्ये बाळगोपाळ श्री कृष्णाच्या जन्मनिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्री कृष्णाला बालपणी दही, दूध, लोण्याच्या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा माता दह्याची हंडी उंच ठिकाणी ठेवत असे. मात्र, श्री कृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
विद्या विहार शाळेत हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. शाळेतील बाळ गोपाळ श्री कृष्णाचे वेष परिधान करून आले होते. शाळेच्या सभागृहात श्री कृष्णाचे सुमधुर गीत घुमत होते. अशा वातावरणात या बाळ गोपाळांनी दही हंडी फोडली. विविध कार्यक्रमाचा मुलांमध्ये संस्कार रुजवणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला परब म्हणाल्या, की अश्या विविध सणांमधून आपल्यात एकात्मतेची भावना वाढीस लागते. कोणतेही कार्य सर्वांनी मिळून केल्यास ते पूर्ण होते. याचा बोध देणारा हा सण आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे उप मुख्याध्यापक कवल परब, जेष्ठ शिक्षक रामकृष्ण मेहता, दक्षता परब व इतर शिक्षकांनी मेहनत घेतली.