पालघर : वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयातील तीन पारिचारीक आणि एका वाॅर्डबाॅयला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी याच रूग्णालयातील दोन पारिचारीकांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर रूग्णालय बंद करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पुन्हा 4 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे वसई गावातील रुग्णालय मंगळवारी दोन पारिचारीकांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे सर्व रुग्णांसाठी ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालय परिसर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवत संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा तीन पारिचारीका आणि एका वाॅर्डबाॅयला कोरोनाची लागण झाली. या तीन पारिचारीकांना दोन महिला परिचारिका तर एक पुरूष आहे. त्याचप्रमाणे एका वाॅर्डबाॅयला देखील कोरोनाची लागण झालेली असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महानगरपालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पारिचारीका व वाॅर्डबाॅयला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसई पश्चिम येथील पालिकेच्या या रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, वाॅर्डबाॅय, वाॅचमन तसेच इतर कर्मचारी मिळून 160 च्या आसपास रुग्णालयीन कर्मचारी सेवा देत आहेत. मंगळवारी दोन पारिचारिकांना कोरोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णालयातील सर्व रुग्णांना पालिकेच्या इतर आरोग्य केंद्रात हलविण्यात आलेले आहे. रुग्णालयाच्या निर्जंतुकीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे बाहेरील कोणालाही आत प्रवेश नसल्याचा फलक लावण्यात आलेला आहे.
शुक्रवारी या रुग्णालयातील तीन आणखीन पारिचारिक व एका वाॅर्डबाॅयचा कोरोना टेस्ट अहवाल पाॅझीटिव्ह आला आहे. एकीकडे खासगी दवाखाने बंद असल्याने वसईतील हे एकमेव रुग्णालय नागरिकांना रुग्णसेवा पुरवत होते, मात्र ते बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. या अगोदर ज्या दोन पारिचारिकांना कोरोना लागण झाली होती त्यांनी वसई पश्चिमेकडील ओमनगर परिसरातील मृत्यू झालेल्या करोनाबाधित रुग्णाची प्राथमिक तपासणी केली होती. त्यामुळे त्याला रुग्णसेवा दिलेल्या त्याच्या संपर्कातील परिचारिका, डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरातच अलगीकरणात ठेवले होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना तात्काळ पालिकेच्या अन्य आरोग्य केंद्रांत हलविण्यात आले होते.त्याचप्रमाणे रूग्णालय परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.