पालघर - जिल्ह्यातील आदिवासी भागात गरीब शेतकरी तरुण वर्ग हा मोगरा उत्पादक बनला आहे. मात्र, या मोगरा उत्पादक शेतकरी वर्गाला लॉकडाऊनमुळे मुंबईसह इतरत्र बाजारपेठा बंद असल्याचा फटका बसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने उपाययोजना केल्या आहेत. बाजारपेठा बंद आणि त्यात लग्नसराई फुलांना होत असलेली मागणी बंद झाली आहे. लग्नेही आता अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लावली जातात. अशा परिस्थितीमध्ये मोगऱ्याला मागणी नाही. त्यामुळे उत्पादित केलेल्या मोगरा कळी वेलीवरच सडून जात आहेत.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा सर्वत्र ठिकाणी येथील तरुणवर्ग मोगरा शेती करतो. मुंबई, दादर आणि इतरत्र ठिकाणी तो स्वतः राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस किंवा रेल्वेने पहाटेच्या सुमारास मोगरा घेऊन जात असतो. उन्हाळी हंगामामध्ये अनेक कार्यक्रमाला बाजारपेठेत आणि किरकोळ विक्रेत्यांकडे मोगरा कळीला मागणी होत असते.
विक्रमगडमधील शिवम मेहता हे गेल्या 15 वर्षांपासून मोगरा उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. ते एप्रिल, मे महिन्याच्या कालावधीत 80 टक्के उत्पादनातून 4 ते 5 लाख रुपये नफा मिळवतात. सरासरी या कालावधीत 200 रुपये प्रति किलो भाव बाजारात मिळत असतो.
दादर, नाशिक आणि पालघर भागात मोगरा विकला जात असतो. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे मोगरा हा वेलीवर सुकून सडत आहे. त्यामुळे उदरनिर्वहासाठी आता पेच निर्माण झाला आहे, असे शिवम मेहता सांगतात. मेहतांप्रमाणे अनेक मोगरा उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे.