पालघर/डहाणू - डहाणू मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तर, भाजपला निवडून देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांना डहाणूतून हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
हेही वाचाउद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नसल्याचे सांगताना त्यांनी मोदींनी राबवलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. आदिवासी, गरीब, महिला आणि शेतमजुरांसाठी आघाडी सरकारने पंधरा वर्षात जे केले नाही, ते युतीने पाच वर्षात करून दाखवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत ते म्हणाले की, सर्वच समस्या सुटल्याचा दावा आम्ही करणार नसलो, तरी केलेल्या कामाचा हिशोब नक्कीच दाखवू शकतो. आघाडीत सामील झालेले सर्वच पक्ष हतबल झाल्यासारखे वाटतात. भाजपने बंगाल आणि त्रिपुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला घरी बसण्यास भाग पाडले. त्यामुळे ही नॅनो पार्टी झाली आहे. ते भ्रष्टाचारी असून फक्त स्वत:चे घर भरतात. त्यामुळे माकपला डहाणूतून नामशेष करा, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थिती बिकट झाली असल्याने या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी महाराष्ट्रात न दिसता बँकॉकला फिरायला गेले. ते हरियाणा, दिल्ली किंवा वायनाडला असावेत असा अंदाज होता. मात्र, ते तिथेही नव्हते. बहुदा पूर्वी त्यांचे 42 उमेदवार निवडून आले होते. आता 24 ही येणार नाहीत ही खात्री त्यांना राहिलेली नाही. त्यामुळेच पक्षाचे वाटोळे झाल्याचे सलमान खुर्शिद म्हणाले असावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात राहुल गांधींनी पहिल्या सभेत केलेल्या भाषणात मागील 70 वर्षांत देशाचा विकास झाला नसल्याचे म्हटले. मात्र, त्यापैकी 60 वर्ष त्यांच्याच कुटुंबाचे सरकार होते हे ते विसरलेले दिसतात. ते ज्या ठिकाणी प्रचाराला जातील, त्या ठिकाणी भाजपचेच सरकार येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. शरद पवारांसह येण्यास कोणी तयार नसल्याने शोले चित्रपटातले जेलर अशी त्यांची स्थिती झाली असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - शौर्य सैनिकांचे अन् हे स्वतःची पाठ थोपटवतायत - शरद पवार
महाआघाडीत सामील बहुजन विकास आघाडीबाबत ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतच शिटीवाल्यांची शिटी वाजवली आहे. आतापर्यंत पालघर जिल्ह्याला भेट देणार्या मुख्यमंत्र्यांपैकी आपण आघाडीवर आहोत. या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि अन्य तालुके बदनाम होते. मात्र, नुकताच प्रसिद्ध झालेल्या केंद्राच्या अहवालानुसार राज्याने देशात सर्वोत्तम कार्य करून हे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी केले.
या जिल्ह्यात धनारे यांच्या माध्यमातून वारली हाट, 95 कोटी रुपयांचे क्रीडा प्रबोधनी आणि अन्य प्रकल्प राबविले आहेत. पंतप्राधांनांनी मासेमारी बांधवांकरिता वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली, धूप प्रतिबंधक बंधारे, सातपाटी बंदरातील गाळ उपसा, दहा हजार शितपेटी वाटप इ. कार्य त्यांच्याकरिता करण्यात आली आहेत. आदिवासी बांधवांना 43हजार वनपट्टे वाटप करण्यासह बिरसा मुंडा योजनेतून विहिरी, पंप, फळबागायती, शेती या योजना राबवल्या असल्यचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
हेही वाचा - 'गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करणारा, विकासकामे काय करणार?'
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यामध्ये डहाणूसह या जिल्ह्याचाही समावेश आहे. पंतप्रधानांनी घर, पाणी, वीज, गॅस, शौचालय नागरिकांना पुरविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यापैकी या जिल्ह्याला साडेतीन लाख गॅस वाटप, 7 लाख घरांची निर्मिती केली असून हा लक्षांक 10 लाखांचा असल्याने 2021 पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही. 3 लाख अतिक्रमणावरील घरं नियमित केली. तर पाच वर्षात 18 हजार गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना पोहचवली. पंतप्रधान जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री आरोग्य कक्ष यांच्या माध्यमातून 90 टक्के जनतेवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या असून त्याचा आकडा 40 लाख आहे.
पालघर जिल्हा मुख्यालयासह, मेडिकल कॉलेज, अडीचशे खाटांचे रुग्णालय निर्माण केले. येथे औद्योगीकरणाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देणार असून पुढील पाच वर्षात राज्यात 1 कोटी रोजगार निर्माण केले जातील. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार संधी देणार आहोत. सत्तेत आलो तेव्हा 3 लाख कुटुंब बचत गटाने जोडले होते, पाच वर्षात ते प्रमाण 40 लाख तर आगामी पाच वर्षात 1 कोटी बचत गटाला जोडणार आहेत. जम्मू काश्मीरात 370 कलम हटविल्यानंतर भारतीय संविधान, कायदे आणि आरक्षण या भागाला लागू झाले आहेत. पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली समृद्ध भारत आणि महाराष्ट्र घडविणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.