पालघर - सीएए व एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या बंद दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे 20 आंदोलनकर्ते तसेच भाजपच्या 3 नगरसेवकांसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पालघर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
बंद दरम्यान आंदोलनकर्ते, भाजप पदाधिकारी व नगरसेवक तसेच व्यापारी संघटना अशा दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी दुपारच्या सुमारास लाठीचार्ज केला. बंदच्या अनुषंगाने काही जणांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी या नोटीसचे उल्लंघन करून पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लाठीमार करावा लागला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.