पालघर - सफाळे रेल्वे स्थानकात लोकल रेल्वे रद्द व एक्स्प्रेस रेल्वेचे वेळापत्रक बदलण्याच्या निषेधार्थ प्रवाशांनी मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) पहाटे रेल रोको आंदोलन केले होते. रेल रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे आंदोलकांचा शोध घेण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत.
रेल रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात पालघर जीआरपीने बेकायदेशीररित्या एकत्र येणे, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि राज्य कोविड-19 नियमन अधिनियम,2020 तसेच रेल्वे अधिनियम 1989 (रेल्वे चालविण्यास अडथळा) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सौराष्ट्र एक्सप्रेसच्या वेळेत बदल
मुंबईच्या जाणाऱ्या सौराष्ट्र एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलल्याने संतप्त प्रवाशांनी मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) पहाटे पालघर येथे रेल्वे रुळावर उतरून निषेध केला, सौराष्ट्र एक्सप्रेस पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी पालघर येथे येत असे. मात्र, आता या गाडीची वेळ बदलून ती पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी करण्यात आली. त्याचसोबत पालघर स्थानकात येणारी 5 वाजून 15 मिनिटांची लोकल रद्द करण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले.
कोलमडली होती पश्चिम रेल्वेची सेवा
पालघर पाठोपाठ सफाळे रेल्वे स्थानकातही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरत राजधानी एक्सप्रेस व डहाणू लोकल रोखून धरली. एक ते दीड तास प्रवाशांनी पालघर, केळवे, सफाळे रेल्वे स्थानकात रुळांवर उतरून रेल रोको आंदोलन केले. यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडली होती.
प्रवाशांकडून निवेदन
पालघर, सफाळे रेल्वेस्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत स्टेशन मास्तरांना लोकल रद्द करण्याचा तसेच एक्सप्रेस ट्रेनचे बदललेले वेळापत्रक पूर्ववत करण्याचा बाबत निवेदन देण्यात आले. स्टेशन मास्तरांनी प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठवण्याचे आश्वासन रेल्वे आंदोलकांना दिले. तर काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जाऊन देखील आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले.
हेही वाचा - एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द; पालघर जिल्ह्यातील मच्छीमार आक्रमक
हेही वाचा - विद्युत वाहिनीचे स्पार्किंग होऊन शेताला आग, आगीत आंबा, काजूची झाडे जळाली