पालघर - तानसा अभयारण्य परिसरातील १० किमी अंतराच्या भागात 'इकोसेन्सेटिव्ह झोन' जाहीर झाल्याने इथले वीटभट्टी व्यवसायिक अडचणीत आले आहेत. लागू झालेल्या इकोसेन्सेटिव्ह भागात दगड, माती उत्खनन आणि प्रदूषण निर्माण करणारे व्यवसायही कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे वीटभट्टी व्यवसायिक आता शेती लागवडीकडे वळायला लागले आहेत.
जंगलक्षेत्र वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील भागामंध्ये निसर्गाला आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतील, असे कोणतेही व्यवसाय करण्याची परवानगी नसते. यासाठी व्यावसायिक आणि शासनाने खबरदारी घेणे आवश्यक असते.
वाडा तालुक्यातील पूर्व भागातील नेहाळपाडा येथून शहापूर तालुका सुरू होतो. नेहाळपाड्याला लागूनच तानसा अभयारण्य सुरू होतेय. या अभयारण्यापासून १० किमीपर्यंत हरित लवादाकडून सुप्रीम कोर्टात १ याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची अंमलबजावणी म्हणून तानसा अभयारण्य क्षेत्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कारखानदारीला बंद करण्याच्या नोटिसा दरम्यानच्या काळात देण्यात आल्या होत्या. यावर वाडा तालुक्यातील काही कंपनीवर्गाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले होते.
तानसा अभयारण्य क्षेत्रातील कारखानदारीनंतर आता वीटभट्टी व्यावसायिकांना 'इकोसेन्सेटिव्ह झोन'मुळे या भागातील व्यवसाय बंद करावे लागले आहेत. या भागात अगदी २० वर्षांपासून सुरू असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांनाही परवाने मिळत नसल्याने व्यवसाय बंद करावा लागला आहे. नेहाळपाड्यातील ज्ञानेश्वर वेखंडे या वीटभट्टी व्यावसायिकाने एक-दीड एकरात कलिंगडाची लागवडीसह इतर भाजीपाल्याची शेती सुरू केली आहे. व्यावसायिकांनी पूर्वी वीटभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेचा वापर भाजीपाला लागवड आणि शेतीसाठी करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
संपूर्ण परिस्थिती पाहता इकोसेन्सेटिव्ही झोन लागू झाल्यामुळे वीटभट्टी व्यवसायिक शेतीकडे वळले आहेत. येथे काही व्यावसायिकांनी शेतजमिनीचे वीजदर परवडत नसल्याने म्हणून लाखो रुपये खर्च करून सौरऊर्जा पॅनेल उभारून शेती करणे सुरू केले आहे. इकोसेन्सिटिव्ह झोन ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी शासनाने योग्य व्यवस्था करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - पालघरमध्ये राज ठाकरे झळकले भाजपच्या बॅनरवर!