पालघर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पडळकराविरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेच समर्थन करता येणार नाही. मात्र, त्यांनी ही टीका का केली याचं संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. तसेच पडळकरांचे वैयक्तीक मत असल्याचेही दरेकर म्हणाले.
आतापर्यंत राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीय वादांच्या पिंजऱ्यात उभे केले. राष्ट्रवादी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांबद्दल टिका करणे चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले. पडळकर यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीक मत असून, ती पक्षाची भूमिका नव्हती. बहुजन समाजाच्या अत्याचारासंदर्भात भूमीका मांडण हा उद्रेक शरद पवारांच्या टीकेला कारणीभूत ठरल्याचे दरेकर म्हणाले.
काय म्हणाले होते पडळकर
धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांनी केवळ राजकारण केले असून बहुजनांवर देखील अत्याचार केल्याचा आरोप भाजपाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार हा राज्याला झालेला कोरोना आहे, अशी टीका त्यांनी केली.
आज (बुधुवार) वसई विरार शहरातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या, प्रशासकीय यंत्रणा व एकूण शहरातील परिस्थिती याचा धावता आढावा दरेकर यांनी घेतला.