पालघर - जिल्ह्यात चोर फिरत असल्याच्या अफवेतून मारहाण केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. घोलवड येथे चोर समजून जमावाकडून पायी जाणाऱ्या भिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. घोलवड पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने व त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
गुरुवारी रात्री चोर आल्याच्या अफवेतून गडचिंचले येथे जमावाकडून तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यातच आणखी एक घटना समोर आली आहे. भिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत भिकाऱ्याचे प्राण वाचवले आहेत.
जिल्ह्यात अफवांमुळे मारहाण करण्याच्या घटना समोर येत असताना देखील जिल्हा पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. तसेच असे प्रकार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन नक्की काय करत आहे? असा सवालही उपस्थित होत आहे.