पालघर - जिल्हा परिषद शाळेकडे पालक व विद्यार्थ्यांनी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आज शहरी व ग्रामीण भागातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी संख्या अभावी व इतर शैक्षणिक सुविधा अभावी बंद पडल्या आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात असल्याचे दिसत आहे. असेच चित्र पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत ( Zilla Parishad School Palghar ) दिसून आले.
अचानक भेटी दिल्या असता शाळेतील गंभीर प्रकार समोर - पालघर जि. प. अध्यक्षा वैदेही वाढाण व जि. प .उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, जि. प .सदस्य प्रकाश निकम, यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील ( Mokhada Taluka ) जि.प शाळांना अचानक भेटी दिल्या असता शाळेतील गंभीर प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना अपुरा पोषण आहार, विद्यार्थी पटसंख्येतील त्रुटी, विद्यार्थ्यांच्या गृहपाठांच्या वहयावर चुकीचे शेरे, विद्यार्थ्यांनी सोडवलेली चुकीचे गणिते, पाहणीत हे वास्तव्य समोर आले आहे. शाळेचे हे चित्र पाहून जि. प. अध्यक्षांनी शिक्षकांना चांगले धारेवर धरले. यावेळी शिक्षकांची उत्तरे देता, देता भंबेरी उडाली. जि. प. शाळेतील हा धक्कादायक प्रकार पाहून जि. प. अध्यक्षांनी शिक्षकांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
शिक्षकाच्या कामावर नाराजी व्यक्त - दरम्यान यानंतर जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपला मोर्चा जव्हार तालुक्यातील तळ्याचापाडा येथील जि.प. शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासली असता ती असमाधानकारक व खूपच कमी आढळल्याने त्यांनी शिक्षकाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या वहया तपासल्या असता विद्यार्थ्यांनी सोडवलेले गणिते चुकीचे असल्याचे आढळून आले व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या वहया तपासात नसल्याचे भेटी दरम्यान निदर्शनात आले. शाळेत विद्यार्थी गैरहजर असताना शिक्षकांनी त्याची हजेरी दाखवल्याचा प्रकार यावेळी दिसून आला.तसेच कुंडाचापाडा जि. प . शाळांना अध्यक्षांनी भेटी दिल्या असता एका केंद्रप्रमुखाच्या निरोप समारंभ कार्यक्रमाला सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग शाळा बंद करून शाळेला लवकर सुट्टी देऊन गेल्याचे भेटी दरम्यान निदर्शनात आले.
केवळ बिले काढली जात असल्याची धक्कादायक माहिती - मोखाडा तालुक्यातील साखरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला सुद्धा जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली असता, भेटीच्या वेळी विद्यालयातील विद्यार्थिनी जेवण करत होत्या, यावेळी जेवणामध्ये चपाती हा मेनू असताना चपाती नसल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच दिवसांपासूनच शाळेचे प्रशासन विद्यार्थ्यांना जेवणात चपाती देत नसल्याचे विद्यार्थ्याकडून समजले. तर फळांमध्ये सफरचंद हा मेनू असताना सफरचंद देत नसल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे मानव विकास व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनी ह्या एकत्र राहतात. मात्र मानव विकास विभागाचे अन्नधान्य प्रत्यक्षात आणले जात नसून केवळ बिले काढली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनींना प्रमाणानुसार दूध दिले जात नाही. जेवणात विविध भाज्याचा समावेश असावा असा शासनाचा नियम असताना वारंवार दोन ते तीन प्रकारच्या भाज्या दिल्या जात असल्याची तक्रारही विद्यार्थ्याकडून करण्यात आल्या. द्राक्षे, पेरू, लिंबू, गाजर, ही फळे विद्यार्थ्यांच्या जेवणासोबत दिली जात नसल्याचही समोर आले.
शिक्षकावर कठोर कारवाई - विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार सकस व पौष्टिक आहार दिला गेला पाहिजे असे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी यावेळी शाळा प्रमुखांना खडसावले. पालघर जिल्ह्यातील. जि. प. शाळेच्या भेटीदरम्यान समोर आलेले शिक्षणाचे गंभीर वास्तव व उडालेला शिक्षणाचा बोजवारा हे चित्र पाहून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या उज्वल भविष्याची खेळणाऱ्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू पाहणाऱ्या, शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल. शिक्षणाबाबत कोणाची गय केली जाणार नाही, असा इशारा जि. प . अध्यक्षा वैदही वाढाण यांनी सर्व जि.प. शिक्षकांना दिला आहे.
परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने व शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज - जि. प. अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, पालघर जिल्ह्यातील डोंगर कपारीतील आदिवासी व गोरगरिबांची मुले देशाच्या पटलावर चमकतील या भूमिकेतून शिक्षकांनी अध्यापन करा, तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांचे खुप शैक्षणिक नुकसान झालेली ते भरून काढण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी.त्यातच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचे समाधान आहे. शिक्षणासाठी कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. असा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्यानंतर शाळेचे गंभीर वास्तव्य समोर आले. शाळेची अशीच अवस्था व शिक्षकांचा मनमानी कारभार असाच चालू राहिला तर शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हि परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने व शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. एकूणच पालघर जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळेत शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
हेही वाचा : Yashomati Thakur Warning : क्वाॅलिटीचं काम झालं नाही तर डोकं फोडेन; यशोमती ठाकूर यांचा अधिकाऱ्यांना दम