उस्मानाबाद- जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, अशी जिल्हावासियांची मागणी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालायाचा विषय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत मांडला जाणार आहे. तिथे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्याचा प्रस्ताव देखील राज्यशासनाकडे आला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या मिळालेल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये कोविड टेस्टिंग सेंटरलाही मंजुरी दिली असून काही दिवसातच ते सुरू होणार असल्याची माहिती अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचा विचार केला तर कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ३४ टक्केच्या पुढे गेली आहे. मुंबईमध्येही रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढलेली आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.