पालघर - वसईच्या कळंब समुद्रकिनारी गुरुवार ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील एकाचा मृतदेह गुरुवारी सापडला तर, इतर ४ मृतदेहांपैकी २ मृतदेह उशीरा रात्री आणि २ शुक्रवारी सकाळी सापडले आहेत.
शीतल गुप्ता (वय ३२) आणि कांचन गुप्ता (वय ३८) या दोघी आणि मौर्या कुटुंबातील निशा मौर्या (वय ४२) आणि त्यांची दोन मुले प्रिया (वय १७) आणि प्रशांत (वय २०) हे ५ जण गुरुवारी समुद्रात बुडाले होते. वसईच्या अंबाडी रोड येथील गोकुल पार्क कॉम्प्लेक्स या सोसायटीत मौर्या आणि गुप्ता कुटुंबीय राहतात. दुपारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी समुद्रकिनारी ते आले होते. त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास दोन्ही कुटुंबातील ८ जण नालासोपारा पश्चिमेच्या कंळंब सुमद्रकिनाऱ्यावर गेले होते. गुरुवारी समुद्राला मोठी भरती असतानाही रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्यांचीही गर्दी जास्त होती.
दुपारी दोनच्या सुमारास ते सर्व पाण्यात उतरले होते. मात्र, भरती असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यात लाटेने ते पाण्यात ओढले गेले. त्यापैकी प्रशांत मौर्याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी भुईगाव किनाऱ्यावर आढळून आला होता. समुद्रात भरती असल्याने शोधकामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी शोधकार्य थांबवले होते. त्यानंतर उर्वरित मृतदेहांपैकी २ मृतदेह गुरुवारी रात्री उशिराने आणि बाकी २ मृतदेह शुक्रवारी सकाळी भाईंदर खाडी, भुईगाव आणि कळंब या वेगवेगळ्या किनाऱ्यावर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.