पालघर/विरार : विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेत असलेला रुग्ण दीड लाखांचे बिल ऐकून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असून रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान डॉक्टर आणि रुग्णाच्या फोन वरून झालेल्या संभाषणाचा ऑडिओ क्लिप वायरल झाली असून त्यात रुग्ण, मी सर्वांना बाधित करेन अशी धमकी देत आहे. या दोघांच्या संभाषणाचा ऑडिओ क्लिप वायरल झाला आहे.
विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ रुग्णालयात १२ जुलै रोजी कोरोनावर उपचार घेण्यासाठी विरार परिसरात राहणाऱ्या एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पाच सहा दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली होती. या उपचाराचे बिल दीड लाखाच्या आसपास असल्याचे रुग्णाला समजताच, या रुग्णाने हॉस्पिटलच्या एचआर सोबत बोलण्याचा बहाणा करून रुग्णालयातून पळ काढला. त्याला डॉक्टरांनी फोन केल्यावर मी सर्वांना बाधित करेन, अशी धमकी दिली आहे. रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - 'लस' म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हाफकीनच्या शास्त्रज्ञांकडून
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती पोलीस आणि पालिका प्रशासनाला देऊन आपले हात वर केले आहेत. मात्र, पोलीस प्रशासन आणि महापालिका या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत. या रुग्णाचा शोध अजूनपर्यंत घेण्यात आलेला नाही. रुग्णांबाबतीत हलगर्जीपणा केल्याच्या या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या प्रकारची माहिती पोलीस किंवा मनपा प्रशासनाला दिली गेली नसल्याची माहिती समोर येत आहे. हा रुग्ण सहा ते सात दिवसांपासून गावभर फिरत असल्याचे ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. त्यामुळे वसई-विरार येथील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
"या रुग्णांवर आम्हाला चाचण्या करायच्या होत्या. मात्र, बहाणा करून हा रुग्ण पळून गेला आहे. बिल मागण्यासाठी फोन केला असता तो उद्धट उत्तरे देत आहे. या प्रकाराबाबत आम्ही प्रशासनाला माहिती दिली आहे." असे विजय वल्लभ हॉस्पिटलमधील डॉ. शैलेश पाठक यांनी सांगितले.