मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही इसम मांडूळ प्रजातीच्या सापांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पथकाने सापळा रचून आंबोली गावाच्या हद्दीत अपोली हॉटेल परिसरातून दोन इसमांना ताब्यात घेतले. या दोघांकडे असलेल्या बॅगेत पोलिसांना अमूल्य किंमतीचे 3 मांडूळ प्रजातीचे दुर्मीळ साप आढळून आले.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
या दुर्मीळ मांडूळ जातीच्या सापांचा उपयोग काळा जादू करण्यासाठी आणि औषधी पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. आरोपींकडून पोलिसांनी 3 मांडूळ प्रजातीचे साप जप्त केले आहेत. बेकायदेशीररित्या मांडूळ साप बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२अंतर्गत कलम ३९ (३)सह ५१ (ब)नुसार कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.