पालघर - जिल्ह्यातील अनेक कुटुंब रोजगारासाठी वारंवार स्थलांतर करतात. त्यामुळे पालकांसोबत मुलांनाही स्थलांतर करावे लागते व त्यांची शाळा सुटते. या स्थलांतराचा परिणाम शाळेच्या पट संख्येवर होतो. हे रोखण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक गावातील खोमरपाडा जिल्हा परिषद शाळेच्या बाबू चांगदेव मोरे या शिक्षकाने चक्क शाळेच्या आवारातच शेती सुरू केली. या शेतीत त्यांनी स्थलांतरित होणाऱ्या गावातील कुटुंबाला रोजगार देऊन शाळेतील विद्यार्थी गळती थांबवण्यात यश मिळवले आहे. त्यांचा हा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
बीडच्या चाकरवाडी येथील बाबू चांगदेव मोरे हे पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील जांभे गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 रोजी रुजू झाले. तेथे त्यांनी 2009 ते 2013 या काळावधीत शिक्षक म्हणून काम केले. नंतर विक्रमगडमधीलच डोल्हारी बुद्रुक गावच्या खोमारपाडा येथे त्यांची बदली झाली. खोमारपाडा हे १ हजार ५०० लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. यातील 35 कुटुंब ही वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम व्यवसाय व इतर कामांसाठी मुंबई, भिवंडी, वसई भागात वारंवार स्थलांतर करत असल्याचे मोरे यांच्या लक्षात आले. या स्थलांतराचा फटका शाळेच्या पट संख्येला बसत होता. स्थलांतरित लोकांना रोजगारही मिळेल आणि शाळेच्या पट संख्येत घट होणार नाही, या उद्देशाने शिक्षक मोरे यांनी या लोकांना शेतीविषयक आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
सन 2016 रोजी त्यांनी शाळेच्या आवारात तालुका पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी कार्यालय यांच्या सहयोगाने विविध पिकांची बियाणे लागवण्या सुरुवात केली. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीने शाळेच्या आवारातच भेंडी, वांगी, पालक, मेथी, आले, बटाटे, कांदे पिकू लागले. शाळेचा परिसर कमी पडला म्हणून कुंड्यांमध्ये आणि काही गावकऱ्यांच्या शेतजमिनीत शेती करून मोरे यांनी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. आर्थिक बाजू बळकट व्हावी म्हणून या शेतीसाठी मुंबईतील 'अक्षरधारा' या संस्थेने कांदे पीक लागवडीसाठी 1 लाख 35 हजार रुपयांची मदत केली. तर 'सुहृदय' या मुंबईतील संस्थेने शाळेसाठी मदत केली. या उपक्रमामुळे 2018 ला शाळेची पटसंख्या वाढल्याची माहिती, शिक्षक बाबू मोरे यांनी दिली.
पिकवलेला शेतमाल हा परिसरातील बाजारपेठेत विकून या स्थलांतरित कुटुंबांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. सध्या खोमारपाडामधील 60 ते 70 कुटुंब शाळेच्या शेतीमधून उदरनिर्वाह करत आहेत. 2019-2020 या कालावधीत येथे कांदा पिकाचे 35 टन उत्पादन घेण्यात आले. लॉकडाऊन काळात शिक्षकांनी, या उपक्रमाला मदत करणाऱ्या मुंबईमधील संस्थांनी आणि गावकऱ्यांनी हा कांदा विकत घेतल्याची माहिती मोरे यांनी दिली.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षक बाबू मोरे यांना विविध संस्थांनी गौरवले आहे. शिक्षक बाबू मोरे यांनी मुलांना शिक्षण देता-देता त्यांच्या कुटुंबांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे.