पालघर/विरार - मुंबई अहमदाबाद महामार्गाशेजारील खनिवाडे खाडीत मासेमारी करण्यास गेलेल्या विकास किणी या मच्छिमाराच्या जाळ्यात चक्क २२ किलो वजनाचा खाजरी जातीचा मासा सापडला. हा मासा अत्यंत चविष्ठ समजला जातो. त्यामुळे आगरी, कोळी बांधवांमध्ये या माशाला मोठी मागणी आहे. २२ किलोचा मासा लागल्याची बातमी गावात पसरताच खवय्यांनी तो मासा खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. तब्बल साडेदहा हजाराला त्याची विक्री झाली.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे बंद झाले आहे. त्यामुळे खाडीकिनारी जाळी लावून मच्छिमार बांधव आपला गुजारान करीत आहेत. आतापर्यंत या खाडीत मासेमाऱ्यांना ८ ते १० किलोचे मासे सापडले आहेत. मात्र, आज तब्बल २२ किलोची खाजरी मासा जाळ्यात लागल्याने ऐन टाळेबंदीत या मच्छिमाराचे नशीब चमकले असल्याचेच म्हणावे लागेल.