पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील दोन आठवड्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. मात्र, बुधवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालघर तालुक्यातील ८ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
पालघर तालुक्यातील काटाळे येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह होता. मात्र, काटाळे येथील ५ आणि डहाणू तालुक्यातील कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना (इंटरन्स) कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच उसरणी गावातील २ तर सफाळे डोंगरी येथे श्वसनाचा विकार असणाऱ्या रुग्णाला करोना संसर्ग झाला आहे.
हेही वाचा - कोरोनाशी लढा : पी अँड जी करणार साडेदहा लाख मास्कचे वाटप
डहाणू येथे लहान मुलीला करोनाची लागण झाल्याने पालघर तालुक्यातील काटाळे, लोवरे, वांदिवली-खरशेत या गावांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या मार्फत घरोघरी पाहणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कासा येथील उपविभागीय रुग्णालय सील करण्याचा आरोग्य विभाग विचार करत आहे.