उस्मानाबाद- बेंबळी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांची कोरोना कक्षामध्ये नेमणूक करण्यात आली होती. मात्र, ते सतत कामचुकारपणा करत गैरहजर राहत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती कायदा लागू करण्यात आला असून संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने अति महत्त्वाचे कामकाज सुरू आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याची जबाबदारी मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांना देण्यात आली होती. मात्र, मुख्याध्यापक खतीब यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता हे क्वारंटाईन सेंटर बंद ठेवत दांडी मारली.
या प्रकरणी गावातील नागरिक श्यामसुंदर पाटील, नितीन खापरे, किरण चव्हाण, विशाल शहा यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर मुख्याध्यापक खतीब यांच्याकडे खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, खातीब यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने मुख्याध्यापक खतीब यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.