उस्मानाबाद - जिल्ह्याला पाणी टंचाईचे ग्रहण कायमचेच आहे. त्यात यंदा कोरोना विषाणूची भर पडली आहे. जून महिना संपत आला असला, तरी अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाई वर्षानुवर्ष होतीच मात्र, यावर्षी कोरोनामुळे येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८ गावांना १५ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहेत. तर इतर ठिकाणी २३६ विंधन विहीरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी मान्सून उशिरा दाखल झाला होता. त्यामुळे जून, जुलैपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश गावांना अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस व नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने लहान मोठ्या धरणातील पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पिण्यासाठी मुबलक पाणी असल्याने पाणीप्रश्न मिटला होता.
एप्रिल महिन्यात जलस्त्रोतातील पाणीपातळी खालावल्याने अनेक गावांना अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मे महिन्यातही तीच परिस्थिती होती. मात्र, जून उजाडताच जिल्ह्यातील काही भागात मान्सून पूर्व व मान्सूनचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे तेथील पाणीप्रश्न मिटला आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी वरुणराजा बरसला नाही. त्यामुळे काही गावात टँकरद्वारे व अधिग्रहणद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.