उस्मानाबाद - गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला निसर्गाचा लहरीपणा, सातत्याने होणारी नापिकी, जिल्ह्यावरती ओढवलेली दुष्काळी स्थिती, वाढत जाणारी महागाई आणि उत्पादनात होणारी घट याचा परिणाम सणांवर देखील होत आहे. उद्या बैलपोळा आहे, मात्र सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये बैल आणि जनावरे धुण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
पोळा शेतकऱ्यांच्या जीव्हाळ्याचा सण मानला जातो. या सणाला जनावरे स्वच्छ धुऊन त्यांना सजवले जाते. त्याचबरोबर त्यांची पूजा केली जाते. वाजत गाजत या बैलांची गावभर मिरवणूक काढली जाते. पूर्वी बैल धुण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. मात्र, सध्या अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. याचा परिणाम या बैल पोळ्यावरतीही झाला आहे.
सांजा गावचे सुनील सूर्यवंशी यांच्याकडे दोन बैल, म्हशी आणि गाय-वासरू अशी जनावरे होती. मात्र, दुष्काळाचे वाढते परिणाम पाहून, सुनील सूर्यवंशी यांनी बैल विकून टाकले. आता त्यांच्याकडे गाय आणि वासरु एवढेच जनावरे आहेत. मात्र, या जनावरांना धुण्यासाठी देखील पाणी नाही. त्यामुळे सुनील यांना विहिरीतून पाणी खांद्यावरती काढून जनावरांना धुवावे लागत आहे. तर. काही शेतकरी बैल घेऊन गावातील हातपंपाचे पाणी उपसून बैल धुवत असल्याचे चित्र आहे.