उस्मानाबाद - राज्याचे जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत हे गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. शनिवारी सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकार्यांचीची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल आणि रटाळ कामाबद्दल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
चारा छावणी चालकांचे अडवलेले बिल, छावणी चालकांना पाण्यासाठीचे मिळणारे बिल आणि त्यासंबंधीची माहिती अजूनही देण्यात आली नाही. तसेच पाणी टंचाईबरोबर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासंबंधी अधिकाऱ्यांना सांवतांनी धारेवर धरले. उस्मानाबाद शहराला तब्बल 20 ते 25 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना त्यांच्या नियोजनाबद्दल मंत्र्यांनी विचारले. तसेच पाण्यासंबंधी नियोजन का केले नाही? असा सवालही सांवतांनी केला.
नवनियुक्त खासदारांचे पिळले कान
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर उस्मानाबाद नगर परिषदेने तानाजी सावंत यांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नगरपरिषदेच्या नगरसेवकांसह खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे उपस्थित होते. त्यावेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या रटाळ भाषणावर नाराज होत, आपल्याला फक्त बोलून दाखवायचे नाही तर काम करून दाखवायचे आहे, असे म्हणत शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे नाव न घेता टोला मारला. तसेच मोजकेच बोला व मुद्द्याचे बोला, असा सल्लाही दिला.