उस्मानाबाद - जिल्ह्यातील सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दोन्ही महिला शिक्षिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन्ही मृत शिक्षिका सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सला नगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी शिक्षण समितीची बैठक होती. दुपारी बैठक पार पडल्यानंतर पाठ्यपुस्तके घेऊन या शिक्षिका सोलापूरला रवाना झाल्या होत्या. भंडारकवठे येथील शशिकला कोळी आणि रोहिणी सपाटे या दोन्ही शिक्षिका दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरुन गावी परत निघाल्या होत्या.
हेही वाचा... दक्षिण काश्मीरमध्ये ८ दहशतवाद्यांना कंठस्नान; पुलवामा आणि शोपियन जिल्ह्यांतील कारवाईत यश
दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्या बाबळगाव तलावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-65 वर भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने या शिक्षिकांच्या अॅक्टिवा (एम.एच. 13-सी.एच. 9867) गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या शिक्षिकांची गाडी जवळपास 50 फूट लांब घसरत गेली आणि त्यातच त्यांचा जागी मृत्यू झाला.